परिस्थिती….काय असते ?

आपण बऱ्याच वेळेस परिस्थिती हा शब्द उच्चारतो, परंतु तो शक्यतो नकारार्थी अर्थानेच. एखाद्याने अडचणीत आपल्याकडे हात पसरले की, त्याला ज्ञानाचे डोस पाजून, “अरे,सध्या परिस्थिती फार वाईट आहे”, असेच म्हणतोमाझी परिस्थिती सध्या छान आहे असे म्हणणारे क्वचितच भेटतील. परिस्थितीच्या रेट्यात आणि तिच्या बरे – वाईटपणामुळे माणसं मात्र एकमेकापासून दूर जात असल्याचे जाणवते. बऱ्याच वर्षाखाली चर्चा करतांना एक निवृत्त मुख्याध्यापक म्हणायचे परिस्थिती म्हणजे काही नाही, आपण करू ती परिस्थिती. मग आपणास चांगल करायचंय तर ते चांगलाच होणार आणि चांगल्या विचारापासून दूर गेल की, वाईट विचाराच्या, वर्तनाच्या, संगतीच्यामुळे चांगला माणूस वाईटच होतो. ही परिस्थिती कोण ओढवून घेत ? आपणच ना ? आपल्या परिस्थितीला आपणच जबाबदार असतो.

बरीचशी माणसं आपल्या चुकांवर पडदा टाकून नशीब, संगत वगैरे वाईट असल्याचे सांगतात कुणी दैवाला तर कुणी देवाला दोष देतात. आपल्या वाईट परिस्थितीला सुधारण्यासाठी आपल्यालाच प्रयत्न करावे लागतात. आपण नाहीच हातपाय हलवले तर चांगली परिस्थिती येईल की वाईट ? महागाई दिवसेंदिवस वाढते आहे. पर्यावरण संतुलन बिघडले, प्रदूषण वाढले, स्वच्छता नाही, खाण्याच्या आहारामध्ये बदल झाले. पर्यायी आरोग्य बिघडते, दवाखान्याच्या पायऱ्या झिजवाव्या लागतात, घरात चणचण भासते, ओढाताण वाढते. आवक मुठभर आणि गरजा सूपभर कसे पुरे होणार ? जास्त आवक होण्यासारखे दुसरे हुन्नर नसतात. वगैरे यात भर आणखी एका मित्राची…..तो म्हणजे आळस..बऱ्याच जणांना आळस हा जवळचा असतो. झालना आजच मग बस्स करा ! उरलेला दिवस आराम करू.

जी माणसं पाहते पासून झोपेपर्यंत उद्योगीच असतात असे माणसं चांगली आवक कमवुन शांत झोपतात.. त्यांची परिस्थिती सुधारत जाते जेमतेम कमविणाराचं मात्र हातावरच पोट असत. हल्ली सामाजिक, राजकीय, रोजगार क्षेत्राचेच वातावरण पुरते प्रदूषित झाले असल्याने साधारण माणसाला परिस्थिती सुधारण्याची संधी पदरात पडणे अति अवघड झाले आहे. त्यामुळे परिस्थितीचा रेटा मात्र प्रत्येकाच्या मागे झोपेतून उठल्यापासून लागतो आहे. त्याला कमी करण्यासाठी प्रत्येकाची धडपड असते. विज्ञानाने झेप घेतली..जग मुठीत आलंय, माणसांची वस्ती मंगळावर होते का ? याचा शोध सुरु आहे. दुसरीकडे “ब्ल्यू व्हेल” सारख्या मोबाईल गेम मुळे तरुण आत्महत्या करताहेत, कुठे लोक रात्रंदिवस अनावश्यक, चैनी, हौसेखातर लाखोंचा चुराडा करताहेत तर दुसरीकडे भाकरीसाठी वणवण फिरणारे आणि विलाजाला पैसा नसल्यामुळे मारणारेही आहेत. हे बऱ्या आणि वाईट दोन्ही परिस्थितीचे दोन परिणाम आहेत. त्यासाठी ज्यांच्याकडे आहे त्यांनी मागच्याला थोड वळून बघण्याची वेळ आहे आणि मागच्यानेही विवेक जागृत ठेऊन अशी परिस्थिती का आहे ? याचा विचार करून वाईट परिस्थितीला चांगली करण्यासाठी धडपडणे महत्वाचे आहे. तेंव्हाच कुठे परिस्थिती बदलू शकेल.

Photo Courtesy of DFB2B 2016

Follow Us on Facebook

3 thoughts on “परिस्थिती….काय असते ?”

Leave a Reply